5th/8th scholarship Online registration,
पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (5वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (8वी)
परीक्षा दिनांक 8 फेब्रुवारी 2026 (वार रविवार)
ऑनलाइन फॉर्म भरण्यासाठी Direct Link
ऑनलाईन आवेदनपत्र भरण्यासाठीच्या सर्वसाधारण सूचना :-
१. पूर्व उच्च प्राथमिक / पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा, विद्यानिकेतन प्रवेश परीक्षेस बसण्यास इच्छुक विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे शाळेने ऑनलाईन पध्दतीनेच भरावयाची आहेत. ऑफलाईन पध्दतीने आवेदनपत्रे स्वीकारण्यात येणार नाहीत.
२. पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा आणि शासकीय, आदिवासी, विजाभज विद्यानिकेतन प्रवेश परीक्षेसाठी एकत्रित एकच आवेदनपत्र आहे. त्यात इच्छुक विद्यार्थ्यांना विद्यानिकेतन प्रवेशासाठी पात्रतेनुसार विकल्प उपलब्ध आहेत.
३. विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन आवेदनपत्रात भरलेल्या माहितीची पडताळणी / खात्री मुख्याध्यापकांनी स्वतः करावी. याबाबत भविष्यात काही प्रश्न उद्भवल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित मुख्याध्यापकांची राहील.
४. विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन आवेदनपत्रांची प्रिंट परीक्षा परिषदेकडे पाठविण्याची आवश्यकता नाही. परीक्षेस बसणाऱ्या विद्यार्थ्यांची यादी, ऑनलाईन आवेदनपत्रांची प्रिंट, आवश्यक प्रमाणपत्रे व शुल्क भरलेल्या ऑनलाईन पेमेंटची रिसिट इत्यादी कागदपत्रे संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांनी आपल्या दप्तरी जतन करून ठेवावीत.
५. ऑनलाईन आवेदनपत्रासाठी विद्यार्थ्यांचा फोटो व स्वाक्षरी एकत्रित स्कॅन करून अपलोड करणे अनिवार्य राहील.
६. विदर्भातील ११ जिल्ह्यातील पालकांचे वार्षिक उत्पन्न रू.१,००,०००/- पेक्षा कमी असल्यास त्याबाबत सक्षम प्राधिकाऱ्याचे (तलाठी / तहसीलदार / प्रांत अधिकारी) प्रमाणपत्र असणे अनिवार्य आहे.
७. विद्यार्थ्यांचे पालक रु.१,००,०००/- पेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असणारे भूमिहीन शेतमजूर असल्यास भूमिहीन शेतमजूर असल्याबाबत व रू. १,००,०००/- पेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असल्याबाबत सक्षम प्राधिकारी (तलाठी / तहसीलदार / प्रांत अधिकारी) यांनी दिलेली प्रमाणपत्रे असणे अनिवार्य आहे.
८. मुद्दा क्रमांक ६ व ७ मधील प्रमाणपत्रांची संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांनी त्यांच्या स्तरावरुन तपासणी करणे बंधनकारक असून सदर प्रमाणपत्र आपल्या दप्तरी जतन करुन ठेवावे व परिषदेने मागणी केल्यास उपलब्ध करुन द्यावेत.
९. ऑनलाईन आवेदनपत्रे भरण्यापूर्वी आवेदनपत्र भरण्याबाबतच्या मुद्देनिहाय सूचनांचे काळजीपूर्वक वाचन करावे. त्यानंतरच ऑनलाईन आवेदनपत्रे भरावीत.
१०. संगणकाची व इंटरनेटची पुरेशी माहिती असलेल्या कर्मचाऱ्यांची / व्यक्तींची ऑनलाईन आवेदनपत्रे भरण्यासाठी मदत घ्यावी.
११. शाळेमध्ये इंटरनेट कनेक्शन नसल्यास अन्य ठिकाणाहून (इंटरनेट कनेक्शन उपलब्ध असलेल्या शाळा, नेट कॅफे इ.) आवेदनपत्रे भरावीत.
१२. नेट कॅफेमधून ऑनलाईन आवेदनपत्र भरल्यास मुख्याध्यापकाने शाळेच्या लॉगीनमधून भरलेली सर्व माहिती अचूक असल्याची खात्री करुनच सबमीट करावे. तसेच सर्व विद्यार्थ्यांचे शुल्क भरले गेल्याची खात्री स्वतः मुख्याध्यापकांनी करावी. यासंबंधी भविष्यात काही प्रश्न उदभवल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित मुख्याध्यापकांची राहील.
१३. परीक्षा परिषदेने आवेदनपत्रे भरण्यासाठी कोणत्याही केंद्रास परवानगी दिलेली नाही अथवा प्राधिकृतही केलेले नाही. शाळेने आपल्या सोयीनुसार इंटरनेट कनेक्शन उपलब्ध असलेल्या ठिकाणी ऑनलाईन आवेदनपत्रे भरावीत.
१४. ऑनलाईन आवेदनपत्रे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in व https://puppssmsce.in या अधिकृत संकेतस्थळावरुनच भरावीत.
१५. ऑनलाईन आवेदनपत्र भरण्यापूर्वी आवेदनपत्र भरण्यास इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना आवेदनपत्रातील सर्व मुद्दयांबाबत सविस्तर माहिती देऊन अवगत करावे.
१६.आवेदनपत्र भरण्यासाठी वेगवान इंटरनेट (Broadband) कनेक्शनचा उपयोग करावा.
१७. आवेदनपत्र भरण्यासाठी शक्यतो गुगल क्रोम, मोझिला फायरफॉक्स ७५ व त्यावरील व्हर्जनच्या इंटरनेट ब्राऊजरचाच वापर करावा. जेणेकरून आवेदनपत्र भरताना कोणतीही तांत्रिक अडचण उद्भवणार नाही.
१८.आवेदनपत्रे भरण्यासाठी शाळांना अकरा अंकी युडायस कोड असणे अनिवार्य आहे.
१९. आवेदनपत्रातील सर्व मुद्दयांची माहिती शाळेच्या रेकॉर्डप्रमाणे अचूक असणे आवश्यक आहे. ऑनलाईन आवेदनपत्रात अचूक माहिती भरणे ही जबाबदारी संबंधित मुख्याध्यापकांची आहे.
२०. आवेदनपत्रातील सर्व अनिवार्य मुद्दयांची (Mandatory Field) माहिती भरल्याशिवाय ऑनलाईन आवेदनपत्र SAVE होणार नाही.
२१. Login Id व Password जतन करून ठेवावेत. ते त्रयस्थ व्यक्तीला देऊ नयेत.
२२. विद्यार्थ्यांचे आवेदनपत्र भरण्यासाठी आधार कार्ड क्रमांक किंवा आधार एनरॉलमेंट क्रमांक अनिवार्य आहे. तथापि बँक खाते क्रमांक असणे अनिवार्य नाही, मात्र विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक झाल्यास त्याचे बँक खाते काढून त्याची माहिती ऑनलाईन शिष्यवृत्ती प्रणालीमध्ये भरण्याची जबाबदारी संबंधीत शाळा मुख्याध्यापकांची राहील.
